वेंगुर्ले शहरातील सर्व CCTV कॅमेरे लवकरात लवकर सुरु करा

वाढत्या दुचाकी चोरी प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाने घेतली पोलीस प्रशासनाची भेट
Edited by: दिपेश परब
Published on: June 03, 2024 14:01 PM
views 417  views

वेंगुर्ला :  वेंगुर्ले शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंद स्थितीत असलेले सि.सि.टिव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरु करणे बाबत, तसेच शहरातील रात्रीची गस्त वाढविणे बाबत चर्चा करण्यासाठी वेंगुर्ले भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर केले. या निवेदनात असे म्हटले कि, वेंगुर्ले शहरात भरवस्तीमधुन दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत दुचाकी चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी शहरातील मेन रोड वरील महालक्ष्मी अपार्टमेंट समोर अच्चुत मेस्त्री यांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली असून अजुन चोरीचा तपास लागलेला नाही.

वेंगुर्ले शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बसवलेले सि.सि. टीव्ही कॅमेरे हे काही ठिकाणी बंद स्थितीत आहेत ते ताबडतोब सुरु करण्यात यावेत. तसेच शहरामध्ये रात्रीच्या वेळी पोलीस गस्त ही वाढविण्यात यावी, जेणेकरून चोरीवर आळा बसु शकेल. तसेच दुचाकी चोरीचा तपास करून, चोरट्यांना जेरबंद करावे व वेंगुर्ले शहर वासीयांना भयमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, महीला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ व वृंदा गवंडळकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर व तालुका चिटणीस प्रसाद नाईक, माजी उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर, ओबीसी सेल चे प्रमोद वेर्णेकर, बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर, भुषण सारंग इत्यादी उपस्थित होते.