
मालवण : मालवण सागरी किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील हायस्पीड ट्रॉलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्याच्या सागरी हद्दीत घुसून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या अश्या नौकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी सातत्याने भूमिका मांडली. त्या नंतर अनेक नौकांवर कारवाई झाली असून सातत्याने मत्स्य विभागाकडून कारवाई सुरु आहे.
बुधवार २४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मालवण समोर अंदाजे १० सागरी मैल पाण्यात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) हे नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली श्री. किशन, रा. कुमठा उत्तर कानडा, राज्य कर्नाटक यांची नौका शिवतेजा नॉ. क्र.-IND-KA-२-MM-५९८० द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोरील समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना पकडली.
या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे.
अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) यांनी पोलिस कर्मचारी गुरुप्रसाद परब तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक, मालवण व वेंगुर्ला यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.










