ही शासनाची फसवणूक ; 'त्या' ग्रामसेविकेवर कारवाई व्हावी

सामाजिक कार्यकर्ते भानूदास तावडे यांची मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 13, 2024 15:06 PM
views 3158  views

 वैभववाडी : तीन अपत्य असताना ग्रामसेवक म्हणुन शासकीय सेवेत रूजु झालेल्या आचिर्णे ग्रामसेविका यांनी शासनाची फसवणुक केली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास दामोदर तावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे केली आहे.

 आचिर्णे ग्रामपंचायतीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेविका सविता भिमराव काळे लग्नानतंर हांडे या २२ डिसेंबर २०१४ मध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये ग्रामसेवक पदी भरती झालेल्या आहेत. त्यांना समिक्षा लक्ष्मण हांडे,सृष्टी लक्ष्मण हांडे आणि उत्कर्ष लक्ष्मण हांडे अशी तीन अपत्ये सन २००७ पुर्वीची आहेत. शासननिर्णयानुसार २००५ नतंर तिसरे अपत्य असल्यास शासकीय सेवेत भरती होता येत नाही. तिसरे अपत्य नसल्याचे शपथपत्र भरतीपुर्वी शासनाकडुन घेतले जाते, असा शासननिर्णय असताना सौ.हांडे ह्या सन २०१४ मध्ये ग्रामसेवक म्हणुन सेवेत रूजु झालेल्या आहेत. ही शासनाची फसवणुक केलेली आहे. या कामात त्यांना त्यांचे पती तथा विस्तारअधिकारी लक्ष्मण हांडे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केलेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हांडे दाम्पत्यांवर शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांनी आतापर्यत शासनाकडुन घेतलेल्या लाभाचा व्याजासह परतावा घ्यावा अशी मागणी त्यांनी लेखी तक्रारीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

या तक्रारीबाबत सविता काळे हांडे यांच मत जाणून घेतले असता त्या म्हणाल्या,  मला दोनच अपत्य आहेत.माझ्याविरोधात भानुदास तावडे यांनी केलेली तक्रार खोटी आहे.  माझ्याजवळ असलेली तिसरी मुलगी मी माझ्या जाऊबाईकडुन दत्तक घेतलेली आहे.असे असताना खोट्या तक्रारी करून मला नाहक त्रास दिला जात आहे.यासंदर्भात श्री.तावडे यांच्याविरोधात मीच तक्रार देणार आहे.