चिऱ्याच्या ओव्हरलोड - भरधाव वाहतुकीवर कारवाई...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 27, 2023 14:09 PM
views 519  views

देवगड : देवगड तहसिलदार आर. जे. पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चिऱ्याच्या ओव्हरलोड, भरधाव वेगातील वाहतुकीवर कारवाई तोरसोळेफाटा, व लिंगडाळ तिठा या दोन ठिकाणावरून मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ५ ओव्हरलोड चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे.

आचरा, देवगड, विजयदुर्ग भागातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड अंधाधुंद गाड्या चिऱ्यांची वाहतूक करतात. या गाड्या चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात असतात. अलिकडेच तोरसोळे येथे झालेला अपघात हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे याला पोलीस, महसुल व आरटीओ विभागाने पायबंद घालण्याची गरज होती.याबाबत प्रशासनाकडूनही तातडीने कार्यवाही झाल्याचे मंगळवारच्या रात्रीच्या कारवाईत दिसून येत आहे.आचरा भागात आडवली, श्रावण व इतर भागात चिरेखाणी आहेत. तर देवगडमध्ये तोरसोळे, विजयदुर्गमध्ये वाघोटन व इतर भागात असलेल्या या सर्व चिरेखाणींवरून परजिल्ह्यात किंवा परराज्यात वाहतूक होते. परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. यात बऱ्यापैकी वाहने ही १६ चाकी ट्रक आहेत. स्पर्धेच्या काळात ही वाहने चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात जातात. गेल्या आठवड्यात तोरसोळेच्या अपघातात तळेबाजार येथील आई व मुलाचा दुदैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकांचा झालेला आक्रोश व संताप प्रशासनाने पाहिलेला होता.

आपल्याकडील रस्ते मोठे नाहीत, अरूंद रस्त्यांवरून ही वाहने भरधाव वेगात धावत असतात. तसेच अनेक ठिकाणी रस्ते वळणाचे असल्याने भरधाव वेगातील वाहने आवरणे कठिण जाते. या मार्गावर काही ठिकाणी शाळाही आहेत. भरधाव वेगातील वाहनांपासून शालेय विद्यार्थ्यांनाही धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अशा ओव्हरलोड तसेच भरधाव वेगातील वाहनांना प्रतिबंध करण्याची गरज होती. तसेच जसे अपघात भविष्यात होऊ नयेत, यासाठी उपाययोजनाही करण्याची गरज आहे. ही सर्व जबाबदारी, पोलीस, महसुल व आरटीओ विभागाची आहे. कणकवली, मालवण व देवगड तालुक्यातील संबंधित यंत्रणांनी याबाबत गांभीर्याने घेऊन उपाययोजना केल्या पाहिजेत.