
दापोली : पालगडचे मंडळ अधिकारी व त्यांच्या पथकाने आज मंडणगड खेड व पालगड दापोली या मार्गावर विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ४ डम्परवर कारवाई केली असून त्यांना सुमारे ६ लाख २५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याची माहिती दापोली येथील तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पालगडचे मंडळ अधिकारी सयाजी पवार व त्यांच्या पथकाने म्हाप्रळ येथून वाळू घेवून खेडकडे व दापोलीकडे जाणारे ४ डम्पर पकडले, त्यातील ३ डम्पर पालगड जवळ असलेल्या शिरखल येथे तर चौथा डम्पर पिसई येथे थांबविण्यात आला, डम्पर चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता तो नसल्याने हे चारही डम्पर दापोली येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून उभे करण्यात आले व त्यांचे मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी एका डम्परमध्ये पाऊण ब्रास तर उर्वरित तीन डम्पर मध्ये प्रत्येकी सव्वा ब्रास वाळू आढळून आली प्रती ब्रास ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला असून प्रती डम्पर एक लाख रुपये दंड असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा दंड या डम्पर मालकांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातील अधिकार्यांनी दिली आहे.