राखीव जंगलात खैरतोड करणाऱ्या आरोपींना अटक

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 15:23 PM
views 116  views

सावंतवाडी : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून एका आरोपीला ताब्यात घेतले तर दोन आरोपी घटनास्थळावरून चकमा देऊन फरार झाले. अटक केलेल्या आरोपीचे नाव लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये असून फरार झालेल्या आरोपींची नावे संदीप रामा गावडे व विश्वास गावडे, दोघे रा.वेत्ये अशी आहेत. 

       याबाबत सविस्तर वृतांत असा की इन्सुलि वनरक्षक संग्राम पाटील यांना क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात फिरती करताना काही लोक खैराची तोड करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी फोन करून कोलगाव वनरक्षक सागर भोजने यांना मदतीसाठी बोलवून घेतले. त्यानंतर या दोघांनी मिळून राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या सदरच्या आरोपींवर सायंकाळच्या दरम्यान झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला असता एक आरोपी ताब्यात मिळाला व इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातील पकडला गेलेल्या आरोपीचे नाव लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये(वय-34) असे असून गुन्हेस्थळावरून फरार झालेल्या दोन आरोपींची नावे संदीप रामा गावडे व विश्वास गावडे अशी असून दोघे ही रा.वेत्ये येथील आहेत.

त्यानंतर सावंतवाडी परिक्षेत्राच्या टीमसह वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी घटनास्थळी येऊन पकडलेल्या आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याबरोबरच फरार आरोपींच्या दोन दुचाकी-एक होंडा शाईन (MH-07 Z 2993) व एक ऍक्टिव्हा (MH-07 AF 8733) यादेखील जप्त करण्यात आलेल्या असून, फरार झालेल्या आरोपींचा वन विभागाकडून कसून तपास करण्यात येत आहे.