
वेंगुर्ले : वेंगुर्ले मठ-सावंतवाडी या मुख्य मार्गावर दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात होऊन दोघेजण जखमी झाले आहेत. यात एकजण गंभीर जखमी झाला असून दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमींला गोवा-बांबोळी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
आडेली कामळेविर येथील शुभम संतोष पेडणेकर (२७) व त्याचे काका चंद्रशेखर दत्ताराम पेडणेकर (५५) हे आपल्या होंडा सिटी या कारने (MH43V2056) आडेली येथे रेशन दुकानावर जात होते. यावेळी आडेली पोस्ट ऑफिस स्टॉपनजिक वळणावर वेंगुर्लेकडून सावंतवाडीकडे जाणाऱ्या दुचाकी (MH07AP4447) यांच्यात धडक झाली. यात दुचाकीचालक साईराज दळवी (रा. नेमळे व गौरव नाईक रा. आडेली भंडारवाडी) हे दोघे जखमी झाले. यात गौरव नाईक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला त्वरित सावंतवाडी येथे तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच वेंगुर्ले सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव, पोलिस हवालदार विठ्ठल धुरी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या घटनेची खबर शुभम पेडणेकर याने वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस हवालदार विठ्ठल धुरी हे करीत आहेत.