
बांदा : मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ह्या कोकणातील जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करणारे व राज्यभरात लाखो अनुयायी असलेले श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) यांचे सोमवारी पहाटे पुणे - सातारा महामार्गावर सातारा शहरानजिक अपघातात निधन झाले. त्यांची सुमो गाडी दुभाजकाला धडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. चालक अत्यवस्थ असून त्यांचेवर मुंबई येथे उपचार सुरु आहेत.
महाराजांचे पार्थिव कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांचे भक्तगण शोकसागरात बुडाले असून लाखो अनुयायी कल्याण येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी डिंगणे, तुळस, कलंबिस्त, देवगड येथे मठाची स्थापना केली होती. दर महिन्यात ते एकदा याठिकाणी येऊन भक्तांना मार्गदर्शन करीत असत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अनेक भक्तगण त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी कल्याण येथे रवाना झाले आहेत.