व्हॅगनर व स्प्लेंडरमध्ये अपघात

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 22, 2023 19:35 PM
views 677  views

कुडाळ : कुडाळ सांगिर्डेवाडी येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मिडलकट येथे व्हॅगनर कार व सुपर स्प्लेंडर मोटरसायकल यांच्यामध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार आर्यन राजेश सावंत (19,माजगाव-सावंतवाडी ) याला गंभीर दुखापत झाली. तर त्याचा मित्र यश संदीप नार्वेकर (19,रा. सावंतवाडी  ) हा किरकोळ जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
      
आर्यन सावंत व त्याचा मित्र यश नार्वेकर आज सकाळी हिरोहोंडा सुपर स्प्लेंडर मोटारसायकलने कणकवली येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परीक्षेला गेले होते. ते  तेथून दुपारी पुन्हा सावंतवाडीच्या दिशेने यायला निघाले. आर्यन हा मोटरसायकल चालवित होता. मुंबई - गोवा महामार्गावर कुडाळ-सांगिर्डेवाडी येथे  व्हॅगनार कारचालकाने आपल्या ताब्यातील कार महामार्ग क्रॉसिंगसाठी  मिडलकटच्या दिशेने वळविली यात कार दुभाजकाकडे आली. त्याचवेळी सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या आर्यन याच्या ताब्यातील मोटरसायकलची जोराची धडक त्या कारला बसली.  यात आर्यन याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर यश हा किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर काही क्षणातच आंबडपाल उपसरपंच  गोट्या चव्हाण व वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाटकर त्या महामार्गावर जात असताना त्यांनी ही घटना पाहिली. प्रसंगावधान राखत त्यांनी रुग्णवाहिकेतून जखमीना तात्काळ कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी सहकार्य केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्राची तनपुरे व सहकार्याने जखमींवर उपचार केले कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  पंचनामा केला. या अपघातात वॅगनार कारचा उजव्या बाजूचे तर  मोटारसायकलच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.