
वेंगुर्ला : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे - मातोंड रस्त्यावर झोया फार्म नजीक गव्यारेड्याने रिक्षाला जोरदार धडक दिली. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा- भोजदळवीवाडी येथील रिक्षाचालक रविंद्र यशवंत दळवी (४३) जखमी झाले आहेत.
रवींद्र दळवी हे आपल्या ताब्यातील एमएच ०७ एएच ६५६४ नंबरची रिक्षा घेऊन होडावडा येथे जात होते. यावेळी तळवडे झोया फार्म नजीक रिक्षा आली असता अचानक गवा रेडा रस्त्यावर आला. यावेळी रिक्षाची गव्याला जोरदार धडक झाली. यात रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालक रविंद्र दळवी जखमी झाले. त्यांना नागरिकांनी नजीकच्या डॉ. कांडरकर यांच्या शुभांगी क्लिनिक येथे प्राथमिक उपचार करून सावंतवाडी येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या तळवडे मातोंड रस्त्याला हा गवारेडा वारंवार नागरिकांना दिसत असल्याने नागरिकांत व वाहन चालकात भीतीचे वातावरण आहे. याबाबत वनविभागाने याची तात्काळ दखल घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.