एसटीखाली सापडला दुचाकीस्वार

Edited by: विनायक गांवस
Published on: August 09, 2025 13:56 PM
views 2195  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जुन्या मुंबई- गोवा महामार्गावर कोलगाव जूना नाका येथे हा अपघात  घडला. यात रुपेश अनिल पाटकर (वय ३९, सध्या रा. पिंगुळी ता. कुडाळ, मूळ माजगांव नाला - कुंभारवाडी ) हा युवक जागीच ठार झाला.

येथील रस्त्यालगत असलेल्या फेब्रिकेशनच्या उघड्या गेटला धडकल्याने तो रस्त्यावर फेकला गेला. पाठीमागून येणाऱ्या एसटीच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली सापडून त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालकासह संबंधित फॅब्रिकेशन मालकावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती. मयत श्री. पाटकर याची एजन्सी होती. शुक्रवारी सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथे सर्व्हिस देण्यासाठी तो आला होता. येथून पिंगुळी येथे परत जात असताना कोलगांव आयटीआय समोरील फेब्रिकेशनच्या उघड्या गेटला त्याच्या पॅशन दुचाकीची जोरदार धडक बसली. यात तो रस्त्यावर फेकला गेला. यावेळी मागाहून येणाऱ्या सावंतवाडी-कणकवली या एसटी ( क्रमांक एम एच २० बीएल २११४ ) च्या पुढील चाकाखाली तो आला. या अपघातात त्याचा जागीच दुदैर्वी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कोलगाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. फॅब्रिकेशनचा गेट उघडा असल्याने अपघात होऊन या युवकाचा हकनाक बळी गेल्याचा आरोप करीत फेब्रिकेशन मालकावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा, मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी दाखल होत पुढील सोपस्कार पार पाडले.

दरम्यान, गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. अपघातग्रस्त एसटीचा चालक  कुणाल हनुमंत सातार्डेकर ( ४०, रा. मोरगांव, ता. दोडामार्ग ) तसेच फॅब्रिकेशनचे मालक रमेश गजानन केनवडेकर ( वय ५०, रा. कोलगांव ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबतची तक्रार मृत रुपेश पाटकरचा भाऊ सचिन पाटकर याने सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत रुपेश याच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. विवाहनंतर तो कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे पत्नीसह वास्तव्यास होता. त्याच्या अपघाती निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.