
वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस घाटी येथे वेंगुर्लेच्या दिशेने जाताना रिक्षाचे ब्रेक फेल होऊन रिक्षा पलटी झाली. यात असलेल्या १० महिन्याच्या बाळाच्या आईला गंभीर दुखापत झाली असून तिला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा- बांबुळी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर त्या महिलेच्याच हाती असलेल्या १० महिन्याच्या बाळाला त्या महिलेने घट्ट पकडल्यामुळे बाळ सुदैवाने बचावले असून सुखरूप आहे.
हा अपघात आज ( ९ मे ) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तुळस घाटी येथे घडला. तुळस मार्गे वेंगुर्ले येथे जाताना तीव्र उतारावर वेंगुर्ले हद्दीत असलेल्या वळणावर रिक्षाचे ब्रेक फेल होऊन रिक्षा पलटी झाली. दरम्यान ही रिक्षा दाभोली येथील साळगावकर नामक व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रिक्षामध्ये २ महिला, एक १० वर्षाचे बाळ व एक ५ वर्षाचा मुलगा असे प्रवासी होते.