तिलारी घाटात अपघात..!

Edited by: लवू परब
Published on: July 15, 2024 14:41 PM
views 420  views

दोडामार्ग : तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे ट्रकाचे ब्रेक निकामी झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस त्याची धडक बसली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघांनाही उपचारासाठी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ४:३० वा.च्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की , तिलारी घाट अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असताना देखील नाशिक वरून गोव्याला जाणारा एक ट्रक सोमवारी सायंकाळी तिलारी घाट उतरत होता. याचवेळी दोडामार्गहून तिलारी घाटमार्गे जयसिंगपूरच्या दिशेने दोघे युवक दुचाकीने जात होते. घाटातील जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर ट्रक आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले व तो भरधाव धावू लागला. दरम्यान दोघे युवक येथील वळण काढून घाट चढत असताना ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकी वरील दोघे युवक दूरवर फेकले गेले व ट्रक रस्त्यालगतच्या झाडीत घुसला. दुचाकी वरील एक युवक बेशुद्ध पडला तर दुसऱ्या युवकाचा डावा पाय जायबंदी झाला. येथून मार्गस्थ होणाऱ्यांनी १०८ नंबरवर रुग्णवाहिकेला पाचारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नंबर वर संपर्क होऊ न शकल्याने जखमींना तातडीने मदत मिळणे कठीण बनले. याच वेळी तिलारी जलविद्युत प्रकल्पाची एक रुग्णवाहिका नेहमीप्रमाणे सायंकाळी तिलारी नगरच्या दिशेने जात होती. या रुग्णवाहिकेतून जखमींना चंदगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

तिलारी घाटातून ३१ ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहनांना बंदी असल्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला होता. तसेच याबाबत योग्य ते नियोजन करण्याबाबत आरटीओ, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते. असे असताना या घाटातून अवजड वाहतूक कोणाच्या वरदहस्तामुळे सुरू आहे? घाट माथ्यावर संबंधित विभागांनी अवजड वाहतुकीस बंदी बाबत नियोजन केले आहे का? जर असेल तर सोमवारी ट्रक घाटातून आलाच कसा? असे नानाविध सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.