
दोडामार्ग : देवगड आगाराची देवगड - पणजी ही एसटी बस व विटा वाहतूक करणारा आयशर कॅन्टर यांच्यात आज हेदुस येथे अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. मात्र या अपघातात आयशर कॅन्टर चे या अपघातात बरेच नुकसान झाले. तर दोडामार्ग बांदा राज्य मार्गावर सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड - पणजी ( बस क्रमांक. एम. एच. २० बी. एल. ४०७८ ) ही एसटी बस आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हेदुस या ठिकाणी आली असता तिला मागून येणाऱ्या आयशर कॅन्टरची ( एम. एच. ०७ जे. ९१२६ ) धडक बसली. सुदैवाने बस च्या मागील सिटवर बसलेल्या प्रवाशांना कोणतेही दुखापत झाली नाही. तर विटा वाहतूक करणाऱ्या या आयशर कॅन्टर च्या दर्शनी भागाचे बरेच नुकसान झाले. बसमध्ये एकूण ३१ प्रवासी होते.
भर रस्त्यात दोन्ही वाहनांमध्ये हा अपघात घडल्यामुळे दोडामार्ग बांदा रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोडामार्ग पोलीस तसेच दोडामार्ग बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक घटनास्थळी हजर झाले.