
दोडामार्ग : दोडामार्गातून अपघाताची मोठी बातमी समोर येतेय. मांगेली येथे कामगारांना घेऊन जाणाऱ्या डंपरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत तर त्यातील एक जण गंभीर जखमी आहे.
हे सर्व रस्ते कामगार आहेत.
अधिक अहिती अशी कि, काजूवाडी येथून मांगेली कडे जात असताना एका अवघड वळणावर डांबर भरलेल्या डंपरचे ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि डंपर मागे येऊ लागला. त्यामुळे डंपर मध्ये मागे बसलेल्या काही कामगारांनी डंपर दरीत कोसळतो या भीतीने उड्या मारल्या त्यात एका कामगाराच्या कुशीत मोठी जखम झाली आहे. तर अन्य पाच जणांना मुका मार लागला आहे. या अपघाताची खबर बाबुराव धुरी यांना मिळतात त्यांनी दोडामार्ग रुग्णालयाची 108 रुग्णवाहिका मांगेलीकडे पाठवून दिली. त्यात जखमी रुग्णांना घेऊन तातडीने हलविण्यात आले. त्यापैकी एक जण गंभीर असलेल्या रुग्णाला गोवा बांबू येथे हलविण्याचे प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, या अपघातावेळी त्या डंपरमध्ये 16 ते 17 जण मागे बसले होते. तर याच डंपरमध्ये डांबराचेही बॅरल असल्याचे पुढे येत आहे. या रस्ते कामगारांना हलविण्यासाठी ठेकेदार पाठवत असलेल्या दुसऱ्या वाहनास वेळ लागणार असल्याने त्या रस्ते काम करताना मजुराने डांबराने भरलेल्या डंपर मधूनच जाण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने मागे येणारा डंपर झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र संबंधित ठेकेदाराने कामगारांच्या जीवाशी असा खेळ करू नये अशी प्रतिक्रिया उमटू लागल्यात.