
संगमेश्वर : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुरधुंडा आणि ओझरखोल दरम्यान रत्नागिरी–चिपळूण एसटी बस आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर अपघातस्थळी ग्रामस्थ आणि आपत्कालीन सेवा तत्काळ दाखल झाल्या. जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसचा चालक वाहनाच्या कॅबिनमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यालाही रत्नागिरीत हलवण्यात आले आहे. या मार्गावर अनेकवेळा अपघात होत असून, महामार्गावर वळण रस्ते आणि योग्य डायवर्शन नसल्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत. या अपघातांमुळे प्रवासी आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, महामार्ग ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहे.
अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि वाहतूक विभागाने तत्काळ रस्त्यावर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.