
दोडामार्ग : वझरे येथील तीव्र वळणावर दोन मालवाहू वाहनांना एका पाठोपाठ मंगळवारी अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सायंकाळी आणखी एका ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने तो पलटी होण्यापासून बालंबाल बचावला. अपघातात ट्रकाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
एक ट्रक रद्दी भरून होंडा गोव्याहून कोल्हापूरला जात होता. यावेळी जवळचा मार्ग म्हणून चालक ट्रक घेऊन आयी-दोडामार्ग मार्गे येऊ लागला. या मार्गावरील वझरे येथील त्या तीव्र वळणावर आला असता चालकाला त्या वळणाचा अंदाज चुकला अन् ट्रक थेट रस्त्यालगतच्या बाजू पट्टीवर रुतला. चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो पलटी होण्यापासून बचावला. दरम्यान मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्यांनी मदतकार्य केले. या वळणावर वारंवार अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे सार्व. बांध. उपविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.