अखेर तिरोडा ग्रामसेवकांचा उपचारादरम्यान मृत्यू

मळगावात झाला होता अपघात
Edited by: दीपेश परब
Published on: March 28, 2025 08:56 AM
views 769  views

वेंगुर्ला : मुंबई- गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभार्ली रस्तावाडी येथे झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या वेंगुर्ला उभादांडा येथील रहिवासी व तिरोडा गावचे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (वय-५२) यांचा गोवा- बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला, बरगड्याना व पायाला गंभीर दुखापत झाली होती. 

   ही घटना गुरुवारी २७ मार्च रोजी सायंकाळी घडली. मयत ग्रामसेवक करंगूटकर यांच्या सहित तिरोडा ग्रामपंचायत युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी अंजली सागर आडारकर (वय ३२, रा. तिरोडा), प्रथमेश प्रमोद कदम (वय- ३०, रा. पेंडूर मालवण), व समीर सदानंद मयेकर (वय- ३९, रा. काळसे सुतारवाडी मालवण) हे जखमी झाले होते. ग्रामसेवक करंगुटकर हे सहकारी कर्मचारी अंजली आडारकर हिच्या सहित ओरोस येथील शासकीय कामकाज आटोपून मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पात्रदेवी बायपासने मळगावच्या दिशेने वळत होते. तर दुसऱ्या दुचाकीवरील प्रथमेश कदम व समीर मयेकर हे दुचाकीने मळगाव येथून बायपासच्या सर्व्हिस रोड वरून मालवणच्या दिशेने जात होते. यावेळी दोन्ही दुचाकींची सामोरा समोर जोरदार धडक झाल्याने चौघेही रस्त्यावर फेकले गेले. 

    या सर्वांना गोवा बांबुळी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील करंगूटकर यांच्या पायावरून ४ चाकी गाडी गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांच्या डोक्याला व बरगड्याना गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान आज पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान करंगूटकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वेंगुर्ला उभादांडा येथे सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, २ भाऊ, बहीण, भावजया असा परिवार आहे. करंगुटकर यांना सामाजिक नाटकांची प्रचंड आवड होती. ते नाटकात कामही करत असत. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.