
दोडामार्ग : दोडामार्ग सीमेवरील वळणावर एक कंटेनर पलटी होता होता थोडक्यात बचावला. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र याचा विपरित परिणाम वाहतुकीवर जाणवला. तब्बल चार तासांहून अधिक वेळ एकेरी वाहतुक सुरू होती. दोन क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला केला व वाहतूक सुरळीत झाली.
राजस्थानहून दोन कंटेनर गुरूवारी सकाळी पाण्याचे पाईप घेऊन गोव्यातील दोडामार्ग ते साळ असे जात होते. मात्र दोडामार्ग सीमेवरील दोन्ही पेट्रोलपंप मधील रस्ता चालकास चुकला. म्हणून चालकाने पुढे येत दोडामार्ग चेकपोस्ट येथील तीव्र वळणावर वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि कंटेनरचे चालकाच्या बाजूची चाके उचलली गेली. ती हवेतच राहिल्याने तेथील उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केली. त्यामुळे चालकाने कंटेनर तसाच उभा केला.
कंटेनरने संपूर्ण रस्ता व्यापला व याचा विपरीत परिणाम वाहतुकीवर झाला. काही चालकांनी रस्त्या बाहेरून वाहने नेली. तब्बल चार तास एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र दुसऱ्या पेट्रोलपंप वर जाणारा रस्ता पूर्णतः बंद झाला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोन क्रेनना पाचारण करण्यात आले. त्यांच्या साह्याने लोह साखळदंडाने कंटेनर हलविण्याचा प्रयत्न सुरू झाला. यावेळी दोडामार्ग पोलिसांनी वाहतुक सुरक्षित ठेवण्याचे कार्य केले. अखेर कंटेनर सुरक्षित बाजूला हलविला व वाहतूक पूर्वपदावर आली.