दापोली मंडणगड मार्गावर भीषण अपघात

एकाचा मृत्यु तर दोनजण जखमी
Edited by:
Published on: November 10, 2024 18:32 PM
views 291  views

दापोली : दापोली मंडणगड मार्गावर माटवण फाटा येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यु तर दोनजण जखमी झाले आहेत. काल (ता.९) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

करंजाणी येथील सुयोग सुरेश सकपाळ (वय- २४) व अथर्व अजय कालेकर (वय- १७) हे दोघेजण पिसई येथे आपली दुचाकी क्रमांक एमएच.०८ बीए.४४१५ घेवून काही कामानिमित्त निघाले होते. माटवण फाटा येथे त्यांची दुचाकी आली असता मंडणगडच्या बाजूने दोन दुचाकीस्वार एमएच.०६ सीएन ४३७४ व  एमएच.०६ सीजे. ०६२० ने येत होते. सुयोग वेगात दुचाकी चालवत असल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व त्याने समोरून येणाऱ्या दोन्हीही दुचाकीरांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुयोग सकपाळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तर अथर्व कालेकर व सनी सोपान जाधव(वय २४) रा. महाड यांना गंभीर दुखापत झाली असून    त्यांना प्राथमिक उपचारासाठी दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

सुयोग हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन बहिणी आहेत. दोन बहिणींचे लग्न झाले होते. तर तिसऱ्या बहिणीचे लग्न ठरले होते. घरातील कर्ता मुलगा गमावल्याने सकपाळ कुटुंबावर मोठं संकट उभे राहिले आहे. सुयोग हा दापोलीमध्ये चैतन्य गॅस एजन्सीमध्ये काम करत होता  सर्वांशी मनमिळाऊपणे वागणारा आपला सहकारी मित्र गेल्याने करंजाणी गावावर शोककळा पसरली आहे. 

अथर्व कालेकर हा मुंबई येथील असून तो दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आला होता. सुयोग सायंकाळी कामावरून आल्यावर अथर्व आणि सुयोग दोघेही पिसई येथे काही कामानिमित्त निघाले होते  त्यावेळी माटवण फाट्याजवळ त्यांचा अपघात झाला   दोन्ही दुचाकींना ठोकर दिल्यावर सुयोगला डोक्याला मार जबर बसला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि अथर्व जखमी झाला त्याचा पायाला दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. 

या अपघातप्रकरणी  अथर्व कालेकर याने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून  त्यात सुयोग सकपाळ  हा  स्वताचे मृत्युस तसेच अन्य दोघाच्या गंभीर   दुखापतीस व तिन्ही मोटारसायकलचे नुकसानीस कारणीभुत झाला असल्याचे म्हटले असून या तक्रारीनुसार या अपघातात मृत्युमुखी झालेल्या सुयोग सकपाळ याचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.