
कणकवली : आगामी नगरपंचायत निवडणूक आमचा पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढवणार की स्वबळावर लढवणार, याविषयी कोणतेही संकेत आमच्या पक्षाने अद्याप आम्हाला दिलेले नाहीत. मात्र 'आम्ही विरुद्ध सर्वजण' हा कणकवली शहराचा इतिहास असून आगामी निवडणुकीच्या लढाईला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आमची सर्व टीम सज्ज असल्याचा विश्वास कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला.
येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. नलावडे बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते. नलावडे म्हणाले, राज्यामध्ये महायुती असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा आगामी कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आमचा भाजप पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढणार की स्वबळावर लढवणार याविषयी अद्याप आम्हाला कोणतेही संकेत नाहीत. आमचे नेते तथा पालकमंत्री नीतेश राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये होईल तो निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही नलावडे म्हणाले.










