
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री, सेवन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पुढाकाराने N-CORD (अमली पदार्थांचे अन्वेषण व नियंत्रण समन्वय समिती) ची मासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
ही बैठक मा. जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थायुगोषा शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोळे, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि समिती सदस्य VC द्वारे उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्ह्यात अमली पदार्थांचे निर्मूलन करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रवीण कोळे यांनी या संदर्भात सांगितले की, अमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर प्रतिबंध घालण्यासाठी सतत गुप्त माहिती गोळा करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
तसेच, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था व परिसरांमध्ये अमली पदार्थांबाबत जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर, अशा पदार्थांची विक्री, वाहतूक अथवा सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक, विद्यार्थ्यांबरोबरच स्थानिक नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांच्या विरोधातील अभियान अधिक प्रभावीपणे राबवून सिंधुदुर्ग जिल्हा “अमली पदार्थमुक्त जिल्हा” करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.











