गद्दारांनी घेतला खोका ; जनतेला दिला धोका !

राष्ट्रवादीकडून ५० खोक्यांचा देखावा करत ओवाळली आरती
Edited by: विनायक गावस
Published on: June 20, 2023 15:33 PM
views 241  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कुडाळ येथे ५० खोक्यांचा देखावा तयार करून आरती ओवाळण्यात आली. याप्रसंगी गद्दारांनी घेतला खोका, जनतेला दिला धोका अशी जोरदार घोषणाबाजी करत ४० आमदारांचा निषेध नोंदविण्यात आला. 50 खोके एकदम ओके, गद्दार सरकार चले जाव आदी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन प्रसंगी देत खोक्यांना आरती ओवाळण्यात आली. खोक्यांना चपलांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.


यावेळी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करत महाविकास आघाडी सरकारमधील ४० आमदार पळून गेल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. पुढे या चाळीस आमदारांनी महाराष्ट्राशी गद्दारी करत दिल्लीश्वरा सोबत हात मिळवणी करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यांच्या या गद्दारीची सर्वांना माहिती व्हावी, या हेतूने आजचा दिवस "गद्दार दिवस" म्हणून पाळण्यात आला. तसेच या गद्दारांच्या गद्दारीची खरी ओळख जनतेसमोर यावी यासाठी '50 खोके एकदम ओके' हे आंदोलन आज कुडाळ येथे घेण्यात आले अस मत कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले. ४० आमदारांनी महाविकास आघाडी विरोधात गद्दारी केली आहे. २०२४ मध्ये राज्यातील जनता या सरकारला जागा दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर म्हणाले की, आजचा दिवस लोकशाहीतील काळा दिवस आहे. शिंदे यांनी हिंमत न दाखविता माझाच पक्ष असल्याचे सांगितले. हा राज्यातील जनतेचा विश्वासघात आहे. मागील एक वर्षात कोकणासाठी या सरकारने काहीच केलेले नाही. केवळ आश्वासने दिलीत. महामार्गाचे काम रखडले असून सिंधुदुर्गात शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. या जिल्ह्याचे सुपुत्र दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री आहेत. हेच आमचे दुर्दैव आहे अशी टीका कुडाळकर यांनी केली.


यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, प्रांतीक सदस्य निलेश गोवेकर, प्रांतीक सदस्य आत्माराम ओटवणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष नझीर शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, इफ्तिकार राजगुरू, सावंतवाडी शहर चिटणीस राकेश नेवगी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.