
सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघातर्फे आजगाव मराठी शाळा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला शुक्रवार २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. २४ व २५ डिसेंबरला भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार २३ डिसेंबरला दुपारी ३ वाजता शालेय प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले. जागृती फेरी, शोभायात्रा, पैठणी स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा व सोडतसंपन्न झाली आहे. रात्री ९ वाजता दशावतारी नाटक होणार आहे. शनिवार २४ डिसेंबरला सकाळी १० वाजता शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. जुन्यासंग्रहित वस्तू शेतीविषयक उपक्रम, नाणी, नोटा, विज्ञान विषयावरील प्रदर्शन, स्मरणिका प्रकाशन, शाळेसाठी जमीन देणारे दाते व आजी-माजी विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच मान्यवरांची भाषणे होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विनायक राऊत, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, माजी आमदार शंकर कांबळी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, राजन तेली, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माजी सरपंच सुप्रिया मेस्त्री, माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत, माजी नगराध्यक्ष संजूपरब, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख शिवाजी गावित यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी ३ वाजता पाककला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत आजी-माजी विद्यार्थी व पालकांना सहभाग घेता येणार आहे. सायंकाळी ६ वाजता साई पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर माया जोशी व सहकाऱ्यांचा स्वरचैतन्य हा गीतगायन कार्यक्रम होणार आहे.
२५ डिसेंबरला सकाळी ९ वाजता परिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून कलावंत, ज्येष्ठ माजी विद्यार्थी, उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या व्यक्ती, प्रशासकीय सेवेतील व्यक्ती, उच्चपदावर सेवाकेलेल्या व्यक्ती, उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी उद्योजक रघुवीर मंत्री अध्यक्षस्थानी आहेत. तसेच उद्योजक विशाल परब, शरद परुळेकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, नवनिर्वाचित सरपंच यशश्री सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यानंतर माजी विद्यार्थी वर्गाचे स्नेहसंमेलन होऊन चर्चा, आठवणी, मनोरंजन, नोकरी-व्यवसाय संधी मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे गुणदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.