समीर नलावडेंना मत म्हणजे नितेश राणेंना मत

नितेश राणेंच भावनिक आवाहन ; विरोधकांनाही सुनावलं
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 23, 2025 14:00 PM
views 194  views

कणकवली : कणकवली शहराला आणखी विकसित करण्यासाठी नगरपंचायतीची निवडणूक महत्वाची आहे. 5 वर्षांपूर्वी मतदान मागताना नीतेश राणे एक आमदार होता. आता तुमचा आमदार असलेला नितेश राणे राज्यात मंत्री आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. केवळ आमदार असताना कणकवली शहराचा कायापालट केला आहे. आता स्वतः मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे कणकवली शहराच्या विकासकामांसाठी विशेष पॅकेज मागितले तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की देतील. फडणवीस सरकारच्या पाठिंब्याचा फायदा कणकवलीवासीयांनी घ्यावा आणि कणकवली शहराचा विकास करण्यासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि सर्व नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले. 

प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे उपस्थित होते. राणे म्हणाले, राज्यातील सत्तेचा कणकवलीच्या विकासासाठी फायदा करून देण्यासाठी आम्हाला सत्तेची साथ द्या. समीर नलावडे आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांना मत म्हणजे नितेश राणेंना मत, कणकवलीच्या विकासाला मत, अशा शब्दांत राणे यांनी भाजपाला मतदान करण्यासाठी आवाहन केले.  

राणे पुढे म्हणाले, कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. मागील 5 वर्षांच्या सत्ताकाळात आम्ही केलेली विकासकामे, कणकवलीला आदर्श शहर बनविण्यासाठी घेतलेले निर्णय आणि विकासनिधींचा योग्य विनियोग यामुळे कणकवली शहराचा विकास झाला आहे. कणकवली 2018 पूर्वी कशी होती? रस्ते कसे होते? आणि आता कणकवली कशी आहे, याचे उत्तर कणकवलीकर स्वतः देतात. रिंग रोडचे जाळे, जानवली नदीवरील पूल यामुळे कणकवली शहर आणखी जवळ आले आहे. 

खासदार नारायण राणेंच्या आशीर्वादाने पुढील 25 वर्षांचा विचार करून कणकवली शहराचा विस्तार आणि विकास आम्ही करत आहोत. शहरात सुसज्ज नाट्यगृह बनविण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठवला आहे. मराठा मंडळाचे भवन उभारणार असून त्याची पायाभरणी येत्या फेब्रुवारी महिन्यात करणार आहोत. सीबीएसई पॅटर्नचे पोदार इंटरनॅशनल स्कुलमुळे कणकवलीकर आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहे. पोदार स्कुलमुळे शहराच्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. बाजारपेठेमध्ये आर्थिक उलाढाल वाढली आहे. फ्लायओव्हरमुळे कणकवलीत रहदारी कमी होणार होती. पण आम्ही केलेल्या नियोजनामुळे शहरात रहदारी आणि वस्ती वाढली. बारमाही धबधब्यामुळे गणपती साना हा पर्यटनबिंदू झाला आहे. पटवर्धन चौकात असलेल्या जुन्या भाजी मार्केटची जागा नगरविकास खात्याकडे हस्तांतर केली आहे. त्या जागी भव्य भाजी मार्केट, बेसमेंटला पार्किंग सुविधा देणार आहोत, असेही राणे म्हणाले.

कणकवलीच्या विकासाचा पहिला टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. पुढील टप्प्यात स्विमिंग, क्रिक्रेट, जॉगिंग ट्रॅकसह सुसज्ज स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार आहोत. अद्ययावत नगरवाचनालय इमारतीचे काम पूर्णत्वास जात आहे. पूढील 5 वर्षांत कणकवली आणखी विकसित करण्यावर भर देणार आहे. कोव्हिडच्या महामारीत भाजपाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरसेवकांनी कोव्हिड सेंटर उभारले. गरजू जनतेसाठी मोफत कमळ थाळी सुरू केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नलावडे आणि आमच्या नगरसेवकांनी जनसेवा केली. खाऊगल्ली, कणकवली पर्यटन महोत्सवासारखे उपक्रम भाजपानेच कणकवलीवासियांसाठी सुरू ठेवले. सत्ता असो अथवा नसो, नगरपंचायतीवर प्रशासक असतानाही कणकवलीत खाऊ गल्ली, पर्यटन महोत्सव सुरूच ठेवला. सत्ताकाळात कुठल्याही नागरी दाखल्यासाठी समीर नलावडे यांनी अडवल्याचा एक कणकवलीकर दाखवा. समीर नलावडे यांनी कणकवली शहर हे आपले घर मानून जनसेवा केली. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय. कणकवली शहर शांत शहर म्हणून बनविण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी भाजपा कणकवलीच्या विकासासाठी मतदारांकडे जाणार आहे, असेही राणे म्हणाले.