
सावंतवाडी : शहरवासीयांच्या आरोग्याव्यतिरिक्त इतर काहीही महत्वाच नाही. डास निर्मुलनासाठी आवश्यक मशीनरी आठ दिवसात खरेदी करा असे आदेश प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी मुख्याधिकारी यांना दिले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्यासह युवकांनी प्रांत श्री.निकम यांची भेट घेत डांसांचा वाढता उपद्रव व प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत लक्ष वेधले. यावेळी प्रांतांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
शहरात वाढलेल्या डासांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत लक्ष वेधूनही योग्य कार्यवाही होत नसल्याने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात एक हजार मच्छर अगरबत्त्या लावणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर तात्काळ प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक लिक्वीड टाकण्याची मोहीम न.प. ने हाती घेतली. मात्र, त्यानंतरही डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आज युवा रक्तदाता संघटनेने प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची भेट घेतली. डासांच्या उपद्रवाबद्दल लक्ष वेधले. वाढत्या मच्छरांमुळे होणारा त्रास, डेंग्यू, मलेरियाची साथ हे पहाता तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी देव्या सुर्याजी यांनी प्रांतांकडे केली.
यावेळी प्रांताधिकारी श्री. निकम यांनी मुख्याधिकारी यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. नागरिकांच्या आरोग्याशिवाय इतर काहीही महत्वाचे नाही. शहरात रोगराई वाढण योग्य नाही. दिवसेंदिवस शहराचा आवका वाढत आहे. अशावेळी दोन ऐवजी चार मशीनरी खरेदी करा, आठ दिवसात डास निर्मुलन मोहीम हाती घ्या, प्रभाविपणे त्याची अंमलबजावणी करा असा सक्त आदेश मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, अर्चित पोकळे, राघवेंद्र चितारी, सुरज मठकर, प्रथमेश प्रभू, अभी गवस, दिग्विजय मुरगोड, वसंत सावंत आदी युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य उपस्थित होते.