
सावंतवाडी : जागतिक महिला दिनानिमित्त जागतिक मानवाधिकार, सामाजिक न्याय आयोग व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. स्त्री ही जन्मतःच कणखर मनाची असते. ती प्रत्येक कुटुंबाचा केंद्रबिंदू असते, कितीही कठीण परिस्थिती येवो, ती परिस्थितीशी दोन हात करते आणि आपल्या कुटुंबाला सावरते. याचं उत्तम उदाहरण असलेल्या सुनंदा सावंत, निर्मला गावडे, स्वानंदी सावंत व कु. साधना या महिलांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
आज स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षा अफाट विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे उच्च व्यासपीठावर तिचा सन्मान होतोय, अनेक मासिक, पेपरच्या पानांवर ती झळकताना दिसतेय. पण हे सगळं करत असताना तिच्या रोजच्या घरकामाचा भार हलका करणारी, तिला बाहेरच्या जगात वावरायला साथ देणारी असते ती तिच्याकडे घरकाम करणारी बाई! घरकामाचा अर्ध्याहून अधिक भार ती उचलते, म्हणून आपण स्त्रिया आपल्या आवडत्या क्षेत्रांत भरारी घेऊ शकतो. म्हणूनच या त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता म्हणून आणि त्यांनी दैनंदिन जीवनात दिलेल्या लढ्याबद्दल आज त्यांचा सत्कार करत आहोत, असे प्रतिपादन आयोगाच्या जिल्हाध्यक्ष व शिशुविहारच्या संचालिका डॉ. सोनल लेले यांनी केले.
सुनंदा सावंत यांनी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर घरकाम करून दोन मुलांना जबाबदारीने मोठे केले. मुलीचे लग्न करून दिले, मुलाला चांगले संस्कार दिले. आज तो पेपरचे काम करतो. निर्मला गावडे यांनी घरकाम करून कुटुंबाचा गाडा हाकलला. मुलाचे आणि पतीचे पाठोपाठ निधन झाले. तो आघात पचवून त्या परिस्थितीशी दोन हात करताहेत. यावेळी माँसाहेब जिजाऊ, महाराणी येसूबाई व महाराणी ताराराणी यांनी पतीच्या अनुपस्थितीत स्वराज्यनिर्मिती व स्वराज्य रक्षण कसे केले याची आठवण डॉ. लेले यांनी उपस्थितांना करून दिली व महिलांनी ती आठवण सदैव जागृत ठेऊन आपले मनोधैर्य वाढवावे असे सांगितले.
स्वानंदी सावंत यांनी पतीला वडापावच्या कामात साथ दिली पण कोविडपासून धंदा बंद झाला. तेव्हा घरकाम करून संसार उभा केला. तर साधना यांचे आई - वडील गेल्यावर भावाच्या साथीने वेगवेगळे पदार्थ घरोघरी रोज चालत जाऊन विकले आणि घर उभे केले. त्यांचा संघर्ष कधीच जगासमोर येत नाही, पण आज त्यांच्या सत्काराप्रसंगी सगळ्याजणीनी आपला संघर्ष मनमोकळेपणाने मांडला. तेव्हा त्यांना आणि उपस्थित सर्वांनाच अश्रू आवर झाले. आयुष्यात आज पहिल्यांदाच आपला सत्कार होतोय, असे सांगताना सत्कारमूर्तींना भरून आले. उपस्थित महिलांनीही आपल्या संघर्षाला वाचा फोडली. प्रांजल सावंत, श्रुती नाईक, पूजा धुरी, सुविधा धुरी, अस्मिता कोळी, उर्मिला राणे, प्रियांका मेजारी यांनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.