
मालवण : विदेशी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त परताव्याचा लाभ मिळण्याच्या आमिषातून मालवणमधील एका व्यापाऱ्याची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार मालवण पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. याबाबत फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास डॉलरमध्ये जास्त परतावा मिळेल. भारतीय चलनात पैसे मिळतील. याबाबत अॅप डाऊनलोड करा, असे सांगून काही रक्कम परतावा स्वरूपात मालवणातील त्या संबंधित व्यापाऱ्यास दिल्यानंतर त्यावर विश्वास ठेवून गेल्या महिन्याभरात मालवणतील त्या व्यापाऱ्याने सुमारे १० लाख रुपयांची रक्कम अॅप डाऊनलोड करून भरणा केली. मात्र डॉलर स्वरूपात अथवा भारतीय चलनात अशा कोणत्याही स्वरूपाचा परतावा त्या व्यापाऱ्यास मिळाला नाही. ज्या व्यक्तीने अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले होते, त्याच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मालवणातील त्या व्यापाऱ्यास आपण फसवलो गेल्याचे लक्षात आल्याने फसवणूक प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.