लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यात भीषण आग

लाखो रुपयांचं नुकसान
Edited by:
Published on: May 18, 2025 19:32 PM
views 59  views

खेड : खेड लोटे औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कारखान्यात आज दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे लोळ तीन ते चार किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते, यावरून आगीची तीव्रता स्पष्ट होते. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहिती नुसार, ही आग लासा कंपनीच्या परिसरात लागली असून त्याचा परिसरातील अन्य कारखान्यांवरही संभाव्य धोका निर्माण झाला होता.

घटनास्थळी लोटे औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दल तातडीने दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. येथील लासा सुपर जिनेरिक्स या कारखान्यात दुपारी दीडच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने रविवार असल्यामुळे कारखान्यात कामगार वर्ग अत्यल्प होता. आग लागल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येताच कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगार कारखान्याबाहेर पळाले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अशी माहिती घटनास्थळावरून प्रात्प मात्र या आगीमध्ये कारखान्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे वृत्त समजताच औद्योगिक विकास महामंडळाचे दोन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केले होते. चिपळूण नगरपालिकेचा बंब सुद्धा घटनास्थळी दाखल झाला. पंचक्रोशीतील शेकडो नागरिक घटनास्थळावर दाखल झाले. या कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नाही. त्याचप्रमाणे फायर हायड्रंट सिस्टीम सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक स्वरूपात असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे कारखाना व्यवस्थापनाला शक्य झाले नाही, असा आरोप पंचक्रोशीतील नागरिकांकडून केला जात आहे. सुरक्षेचे मापदंड धाब्यावर बसवून आपले व्यवसाय करणाऱ्या या कारखानदारांवर वरदहस्त कोणाचा आहे ? असा संतप्त सवाल पंचक्रोशीतून केला जात आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील अपघात हे नित्याचे झालेले असून रासायनिक कंपन्या चालवत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने पाळावयाचे नियम धाब्यावर बसवून या कंपन्या चालवल्या जात आहेत. यावरती कारखाना निरीक्षक हे कोल्हापूर येथून लक्ष ठेवून असतात. त्यामुळे कारखाना निरीक्षकांचे कार्यालय हे औद्योगिक वसाहती नजीक असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. हे वाढते अपघात पाहून आत्तातरी हे कार्यालय या ठिकाणी येईल अशी आशा करूया अशी प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी दिली.




--