
सावंतवाडी : येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी जिल्ह्यातील शेतकरी व फळ बागायतदारांनी जोरदार आंदोलन करत शक्ती प्रदर्शन केले. येत्या मंगळवारपर्यंत काजू अनुदानाच्या अटी शिथिल झाल्या नाहीत तर बुधवारी पुन्हा रास्ता रोको सारखे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या. काजू बी ला प्रतिकीलो २०० रुपये हमीभाव मिळावा आणि काजू अनुदान तातडीने वितरित करण्यासाठी जाचक अटी रद्द करा अशा मागण्या घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व फळ बागायतदारांनी शुक्रवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले असता एक अट शिथिल करून सामाईक जमीनीमधील लाभार्थीचे हमीपत्र घेण्याचा निर्णय मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने झाल्याचे पत्र तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपोषणस्थळी आणले. यावेळी उपोषणकर्त्यँानी येत्या मंगळवारपर्यंत जाचक अटी रद्द झाल्या नाहीत तर बुधवारी पुन्हा प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मंत्री दिपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन समाईक जमीनीमधील लाभार्थीचे हमीपत्र लिहून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यास पणनमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला तो निर्णय तहसीलदार श्रीधर पाटील यांनी वाचून दाखविला. तेव्हा फळबागारतदार शेतकऱ्यांनी जीएसटी अट रद्द झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली.
यावेळी आंदोलनकर्ते विलास सावंत, वसंत उर्फ अण्णा केसरकर, सुरेश गावडे, अन्य शेतकऱ्यांनी निर्णय घेण्यासाठी शासनाला वेळ दिला. येत्या मंगळवारपर्यंत काजू अनुदान अटी शिथिल करून वाटप करण्याचा निर्णय घेतला जावा, अन्यथा बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
शासनाने काजू अनुदानापोटी २७९ कोटी रुपये काजु उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी शर्ती रद्द करून विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे , काजू बी ला प्रतिकीलो २०० रूपये हमीभाव मिळावा, विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, वन्य प्राणी नुकसान करत आहेत ती भरपाई आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे, काजू आयात शुल्क २० टक्के करावे, एखादं झाड तोडले तर ५० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे त्या शासन निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला,अशा विविध विषयांवर आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी सावंतवाडी – दोडामार्ग फळबायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, माजी आमदार राजन तेली, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, प्रवीण परब, माजी सरपंच सुरेश गावडे, अभिमन्यू लोंढे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी आंदोलनाला भेटी देत आपले विचार मांडले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती प्रमोद सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, मायकल डिसोझा, संजय देसाई, चंद्रशेखर देसाई, अभिलाष देसाई,एकनाथ नाडकर्णी, ज्ञानेश परब, डॉ. सर्वेश नारकर, शामसुंदर राय, दिवाकर म्हावळणकर, प्रवीण परब, मधुकर देसाई, विभावरी सुकी,जगदेव गवस, संदीप सुकी, बाब्या म्हापसेकर, संजय राऊळ तसेच शेतकरी व फळ बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या सिंधुदुर्गातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींना स्वयंस्फूर्तीने आल्याने आणि शेतकरी एकजूट दाखवून दिल्याने सर्वांचे अध्यक्ष विलास सावंत यांनी आभार मानले. ज्या विविध तेरा संघटनांनी आणि इतरांनी या उपोषणास उपस्थित राहून पाठिंबा दिला त्यांचेही सावंत यांनी आभार मानले.