कणकवलीत ठाकरे गटाला धक्का..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 21, 2024 09:12 AM
views 1686  views

कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी आपल्या शहर प्रमुख या पदाचा तडका फडकी राजीनामा दिल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. या राजीनाम्या नंतर काही वेळातच मसुरकर यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, खजिनदार भास्कर राणे,  यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांच्यावर लगेचच कणकवली शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे मसुरकर यांनी राजीनामा दिला आहे. कणकवली शहराचे ठाकरे गटाचे शहर प्रमुख म्हणून मसुरकर कार्यरत होते. ठाकरे गटाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काहीच दिवसात त्यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख म्हणून कार्यरत असताना वरिष्ठाकडून वारंवार डावलण्यात येत असल्याचा आरोप मसूरकर यांनी केला. शिवसेना संपर्कप्रमुख व तालुकाप्रमुख यांना देखील हे राजीनामा पत्र मसुरकर यांनी दिले आहे. प्रमोदशेठ मसूरकर यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये असलेली अंतर्गत गटबाजी देखील या निमित्ताने समोर आली असून वरिष्ठांवर केलेल्या आरोपाने पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांना डावलणारे ते वरिष्ठ कोण? असा देखील सवाल असा उपस्थित केला जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी शेखर राणे, निलेश तेली, नाना सापळे, प्रशांत वनस्कर, सुनील पारकर, चिन्मय रावराणे, मारुती सावंत, बाळू पारकर आदी उपस्थित होते.