
सावंतवाडी : जागतिक स्तरावर 'अतिशय दुर्मिळ' आणि 'धोक्यात' म्हणून घोषित असलेल्या खवले मांजराला आंबोली येथे जीवदान मिळाले आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून पकडलेल्या या दुर्मिळ प्राण्याला आंबोली वनविभागाच्या जलद कृती दलाने तातडीने बचावले आणि सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
आंबोलीमधील रेनहिल्स हॉटेलच्या बाजूला भटक्या कुत्र्यांनी एका खवले मांजराला पकडल्याची माहिती मिळताच, वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.या बचावकार्यात जलद कृती दलाचे सदस्य प्रथमेश गावडे, वनरक्षक संग्राम पाटील, वनरक्षक बदाम राठोड, कल्पेश परब आणि प्रफुल गावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी त्वरित आणि कौशल्याने खवले मांजराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. बचावल्यानंतर या मांजराला त्वरीत वैद्यकीय उपचार पुरवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, हा प्राणी पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. वनविभाग तसेच मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांच्या उपस्थितीत या खवले मांजराला सुखरूप वनामध्ये सोडण्यात आले. या दुर्मिळ प्राण्याला वाचवून वनविभागाने वन्यजीव संरक्षणाप्रती त्यांची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
खवले मांजर ही अतिशय दुर्मिळ प्रजात असून, अंधविश्वासपोटी त्यांच्या खवल्यांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांची शिकार केली जाते. यामुळे ही प्रजात जगात अत्यंत धोक्यात आली आहे. वनविभाग आणि वन्यजीव संरक्षकांनी केलेल्या या यशस्वी बचाव कार्यामुळे आंबोली परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रथमेश गावडे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा दुर्मिळ जीवांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे.










