
संगमेश्वर : तालुक्यातील चिखली कानालवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या चिखली तांबेडी रस्त्यावरील फरशीला दोन ठिकाणी मोठी भगदाडे पडली असून, गेले महिनाभरात याठिकाणी दुचाकीचे अनेक अपघात झाले आहेत. मात्र तक्रार करुन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रिक्षा संघटना आक्रमक झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिखली तांबेडी रस्त्यावर कानालवाडी येथे एक फरशी बांधण्यात आली आहे. मुळातच ही फरशी कमी उंचीची असल्याने पावसाळ्यात अनेक वेळा पाणी भरल्याने हा मार्ग बंद होत असतो. त्यातच निकृष्ठ कामामुळे या फरशीला अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. गेल्या महिनाभरात याठिकाणी दुचाकी तसेच रिक्षाचे अनेक अपघात घडले आहेत. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
यामुळे येथील रिक्षा संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्यावतीने अध्यक्ष मिलिंद चव्हाण व उपाध्यक्ष संदीप चिले यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.