
दोडामार्ग : लोकसहभागातुन सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळकट no.1 येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निरंजन डा डावखरे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या "संगणक संच, ग्रामपंचायत तळकट यांचे कडून प्राप्त CCTV आणि WiFi " या आधुनिक सुविधांचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा नुकताच दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, सरपंच सुरेंद्र सावंत भोसले व युवा उद्योजक अंकुश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली असून शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे. हा उपक्रम मा. आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या निधीतून राबविण्यात आला असून त्यासाठी सुधीर दळवी यांनी याकामी विशेष प्रयत्न केले आहेत. ग्रामपंचायत तळकट यांच्या सहकार्याने शाळेत CCTV व WiFi सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे, तसेच ऑनलाईन शिक्षण अधिक सुलभ होणार आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी सुसंगत राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य व प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. शाळेच्या प्रगतीसाठी अशा सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचेही उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत तळकट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी मान्यवर यांच्या समवेत उपसरपंच रमाकांत गवस, पोलिस पाटील रामदास देसाई, तंटामुक्त समिती अध्यक्ष रामचंद्र सावंत, श्री वेटे चेअरमन तळकट झोंबळे सोसायटी, केंद्रप्रमुख श्रीमती जोशी मॅडम, माजी सरपंच एम. डी. धुरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती लक्ष्मी डांगी, उपाध्यक्ष अमोल मळीक, तळकट प्रशालेचे मुख्याध्यापक जनार्दन पाटील,पदवीधर शिक्षक जगधने तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवर, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि गावकरी मंडळी, शिक्षणप्रेमी या साऱ्यांचे नेहमीच सहकार्य मिळतं असल्याबद्दल मुख्याध्यापक पाटील यांनी उपास्थितांचे विशेष आभार मानले.










