
राजापूर : केंद्रातील मोदी सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी जनतेला एक मोठा सुखद धक्का दिला आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय असून तो तमाम मराठी बांधवांसाठी आनंदाचा क्षण आहे. यापुढे
मातृभाषा अधिक समृध्द करण्यासाठी सध्या आणि पुढच्या पिढीने पुढे यावे, असे आवाहन माजी आमदार डाँ. विनय नातू यांनी केले आहे. डॉ. नातू म्हणाले, मराठी माणसाला त्याच्या न्याय हक्कासाठी सतत संघर्ष
करावा लागला. इतरांना जे सहजगत्या मिळते त्याचसाठी मराठी माणसाला लढावे लागते. मराठी ही पहिल्या 15 भाषांमध्ये आहे. 20 कोटी लोक मराठी बोलतात. 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची विनंती करणारा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता.
अभिजात भाषा म्हणून भाषांचा समावेश केल्याने विशेषतः शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील याशिवाय मराठी भाषेच्या प्राचीन ग्रंथांचे जतन, दस्तऐवजीकरण आणि डिजीटायझेशन संग्रहण, भाषांतर, प्रकाशन आणि डिजीटल मीडियामध्ये नोकऱ्या निर्माण होतील, असे सरकारने या निवेदनात म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढणार असल्याचा आशावाद डॉ. नातू यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उशिरा का होईना सरकारने मराठी भाषेला अभिजात हा दर्जा दिला, याचा माझ्यासह कोट्यवधी लोकांना आनंद आहे, असे गौरोद्गार डॉ. नातू यांनी काढले.