
दोडामार्ग : छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेले बलिदान या प्रेरणेतून धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी शिव पाईकांनी बलिदान मासात झरेबांबर तिठा येथे मंगळवारी एका रात्रीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शत्रपती संभाजी महाराजांचे भव्यदिव्य पहिले स्मारक आहे. दोडामार्ग तालुक्यातील हजारो शिवभक्तांनी या स्मारकाचे दर्शन घेत मानवंदना दिली. डोळ्यात आनंदाश्रू आणि अंगावर रोमांच आणणारा हा क्षण हजारो दोडामार्ग वासियांनी याची देही याची डोळा पहावयास मिळाला असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
देव देश आणि धर्मासाठी स्वतःचे बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजां स्मारक प्रत्येक ठिकाणी व्हावे. यातूनच हिंदू धर्म जागृत ठेवण्याची भावना प्रत्येक हिंदुंच्या मनात रुजली पाहिजे. या हेतूने तमाम शिवपाईक व शिवप्रेमी, धारकरी काम करीत आहेत. तालुक्यातील काही धारकऱ्यांकडून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक दोडामार्ग तालुक्यात उभारले जाणार अशी गुप्त चर्चा सुरू होती. त्या पद्धतीने युद्ध पातळीवर नियोजन सुरू होते. मात्र, हे स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जाणार कोणालाच माहीत नव्हते. धर्माभिमानी शिवपाईक या मोहिमेसाठी तन, मन, धन अर्पण करून या कामात झोकून दिले होते.
राष्ट्र पुरुषांचे स्मारक उभारण्यास प्रशासकीय मान्यतेस क्लिष्टता असून अनेक अडचणी समोर ठाकतात. त्यामुळे या शिव पाईकांनी आज हिंदुस्थानचे आराध्य दैवत ज्यांचा आदर्श अखंड हिंदुस्थानाने आपल्या डोळ्यांसमोर ठेवला आहे. त्यांच्याच गनिमी काव्याने छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारून शिवपायिकांनी आपल्या स्वप्नातील संकल्पना सत्यात उतरवली. या कार्यात काहींनी अंगमेहनतीने, काहींनी वस्तू स्वरूपात तर काहींनी आर्थिक स्वरूपात हातभार लावला आहे. "धर्मरक्षक, धर्माभीमानी छत्रपती संभाजी महाराज"यांचं भव्य स्मारक उभारण्यात आले. एखादा निश्चयं मनाशी केला कि मागे हटायचं नसतं हि छत्रपतींची शिकवण आणि तिचं शिकवण याकामी शिवपाईकांनी जोपासली. यापुढेही या स्मारकाची निगराणी तालुक्यातील आम्हीं शिवप्रेमी करणार असल्याचे सांगत आहेत. सर्व शिव पाईकानी आपली सेवा महाराजां चरणी रुजू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.