मंत्री केसरकरांच्या घरावर आजरा ते सावंतवाडी निघणार लॉंग मार्च...!

Edited by:
Published on: October 28, 2023 12:51 PM
views 468  views

सावंतवाडी : २० पटसंख्येपेक्षा कमी संख्या असल्याचे कारण पुढे करीत राज्यातील पंधरा हजाराहून अधिक शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात शिक्षण मंत्री ना दिपक केसरकर यांच्या घरावर आजरा ते सावंतवाडी असा लॉंग मार्च निघणार आहे. शनिवार दि. २८ ऑक्टोबर पासून निघणाऱ्या या शिक्षण हक्क यात्रेत हजारो लोक सहभागी होणार असल्याची माहिती या आंदोलनाचे प्रमुख कॉ. संपत देसाई यांनी दिली.

ते पुढे असे म्हणाले की राज्य सरकारच्या या धोरणामुळे वाडी वस्तीवरील हजारो शाळा बंद होणार आहेत. याचा पहिला फटका मुलींना बसणार आहे. समूह शाळेच्या नावाखाली खाजगीकरणाच्या दिशेने सरकार वाटचाल करीत आहे.

शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण सर्वाना मोफत उपलब्ध होईल असे वाटतं होते. पण त्याचं कायद्याचा गैरवापर करीत राज्य सरकार बहुजन समाजातील कष्टकरी जात वर्गातील मुलांच्या शिक्षणाचा गळा घोटू पाहतंय. मुळातच इथे शिकण्याला बंदी होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या संघर्षातून आता कुठे पहिली पिढी शिकत आहे. त्यांच्या शिक्षणाची वाट कायमची बंद करणारे हे धोरण आहे. याविरोधात हे आंदोलन आम्ही सुरु केले आहे.

जोपर्यंत वीस पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुजाण नागरिक, पालक शिक्षक यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही शाळा बचाव आंदोलनाच्यावतीने करीत आहोत .