
वेंगुर्ला:
प्रितेश राऊळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो की या गावात सातत्याने विविध उपक्रम ते राबवत असतात. नारायण राणे यांनी ग्रामीण भागातून जाऊन राज्याच्या मुख्यमंत्री आणि आता केंद्रापर्यंत जात केलेले काम या जिल्ह्याला आदर्शवत आहे. आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्त हा दशावतारी महोत्सव आयोजित करून लोककलेचा सन्मान केला जातोय हा स्तुत्य उपक्रम असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी रेडी येथे बोलताना सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढिवसानिमित्त रेडी येथे प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या वतीने पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप रेडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दशावतार नाट्य महोत्सवाचे उदघाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, पं स माजी सदस्य मंगेश कामत , रेडी सोसायटी चेअरमन चित्रा कनयाळकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, मच्छिमार नेते वसंत तांडेल, रेडी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर राऊळ, जेष्ठ दशावतार कलावंत जयसिंग राणे, दादा नाईक, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजाता देसाई, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, गोरे दशावतार नाट्य मंडळाचे मालक सुधाकर दळवी, होडाडेकर गुरुजी, रेडी ग्रा प सदस्य मानसी राणे, कलच्यावकर, शमिका नाईक, रिचा सावंत, गणेश भगत, रश्मी रेडकर, आनंद भिसे, आरवली ग्रा प सदस्य सोनाली कुडव, रेडी माजी ग्रा प सदस्य गायत्री सातोस्कर, विधी राणे, दीपक राणे, स्नेहल राणे, सौ, करलकर , मधुरा नाईक, विजय बागकर, अण्णा गडेकर, सागर राणे, आबा राणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राजन तेली म्हणाले, रेडी हा गोवा राज्याच्या शेजारील भाग आहे. गोव्यातून आज हजारो पर्यटक मालवण येथे जातात. रेडी पासून शिरोडा व आरवली, सागरतीर्थ मोचेमाड पर्यंत पर्यटनाला मोठा वाव आहे. याठिकाणच्या जमिनी घेण्यासाठी परराज्यातील उद्योजक टपून आहेत. त्यामुळे स्थानिकांनी आपल्या जमिनी न विकता छोटेमोठे उद्योग सुरू करावे. पर्यटनाला दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. मात्र अपेक्षेप्रमाणे खर्च होत नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी सहित सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
रेडी गावाने दशावतार तसेच कला - क्रीडा, सामाजिक क्षेत्रात अनेक रत्ने निर्माण केली आहेत. दशावतार कला जपण्यासाठी प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या वतीने पुढाकार घेत हा महोत्सव आयोजित केला जातो. प्रितेश राऊळ व रामसिंग राणे यांनी गावात सामाजिक राजकीय क्षेत्रात अगदी कमी वयात चांगल्या प्रकारे काम केले आहे. आणि याचीच पोचपावती म्हणून भाजप पक्ष, नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेडी गावाला भरगोस निधी दिला आहे. असे यावेळी मनिष दळवी यांनी बोलताना संगितले
यानंतर चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा शिवशक्ती वेताळ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. आज ९ एप्रिल रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे, कुडाळ यांचा कृष्ण पूजन नाट्यप्रयोग, ११ एप्रिल रोजी अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा पंढरीचा पहिला वारकरी नाट्यप्रयोग, १२ एप्रिल रोजी गुरूकृपा दशावतार नाट्य मंडळ , हळवल यांचा द्रौपदी वस्त्रहरण नाट्यप्रयोग, १३ एप्रिल रोजी हेळेकर दशावतार नाट्य मंडळ , कारिवडे यांचा एक डाव नगीनीचा नाट्यप्रयोग, १४ एप्रिल रोजी सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, झरेबांबर,दोडामार्ग यांचा शापमुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आले.