ओरोसमध्ये साजरा होणार आनंदोत्सव...!

भरणार नैसर्गिक शेतीचे प्रदर्शन | डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 10, 2024 12:57 PM
views 168  views

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिजामाता संकुल ओरोस येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. माजी खासदार सुधीर सावंत यांनी नैसर्गिक शेतीची चळवळ उभी करुन अंमलबजावणी केल्यानंतर समृद्धी आणि आनंदी गाव प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या तत्त्वावर आनंदोत्सव चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून महोत्सव मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

या आनंदोत्सवा मध्ये जागतिक किर्तीचे अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन होणार असून त्यांचा कृषी भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. डॉक्टर माशेलकर हे या जिल्ह्यातील शेतकरी उद्योजक व विद्यार्थी यांच्याशी खास संवाद साधणार आहेत. पहिल्या दिवशी मोफत आयुर्वेदिक/ ऍलोपॅथी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पहिले तीन दिवस भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

नैसर्गिक शेती भरडधान्य लागवड, आंबा काजू मोहर संरक्षण, बांबू लागवड, शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण, जलजीवन मिशन, उद्योजकता विकास इत्यादी विषयाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भरडधान्य पाककला स्पर्धा, नैसर्गिक कृषी निविष्ठ प्रात्यक्षिके, शिवार फेरी व शिवजयंती दिवशी शिवचरित्रावर खास व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ठाकर लोककला व दुसऱ्या दिवशी वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. तमाम जनता व शेतकरी यांनी या आनंदोत्सवात सहभाग घेऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले आहे.