
मालवण : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत आज पोलीस दलाच्या वतीने 'रन फॉर युनिटी' एकता दौड आयोजित करण्यात आली होती. या भव्य दौडला नागरिक, विविध संस्थांचे सदस्य आणि पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून आणि येथील पोलीस ठाण्याच्या वतीने देऊळवाडा ते रेवतळे तिठा ते देऊळवाडा अशी भव्य एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, तसेच पत्रकार समिती सचिव कृष्णा ढोलम, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत, आपा मालंडकर, आस्था ग्रुप अध्यक्ष उमेश मांजरेकर, सौगंधराज बादेकर, चौके सरपंच पी. के. चौकेकर, पाटीदार समाजाचे शांती पटेल, मोहन पटेल, मातृत्व आधार फाउंडेशनचे दादा वेंगुर्लेकर यांसह अन्य संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी सहभागींनी "विविधता मध्ये एकता हा देशाचा अभिमान आहे, म्हणून भारत माझा देश महान आहे.", "लोगोंको दो एकता का ज्ञान, उनके अंदर जगाओ नया सन्मान, अनेकता मे एकता भारत की विशेषता.", "जोड सको तो सबको उसका नाम है एकता, इसी से मिलती है दुनिया मे सफलता, देश तभी बनेगा महान, जब एकता बनेगी हमारी पहचान." अशा हातात घेतलेल्या फलकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
दौड सुरू होण्यापूर्वी संस्था प्रतिनिधींचे स्वागत पोलीस निरीक्षक श्री. जगताप यांनी केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्रीमती खोत यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. जगताप म्हणाले, "भारताच्या स्वातंत्र्यानंतर जी संस्थाने होती ती वेगवेगळी होण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंडता आणि पूर्वीचा हिंदुस्थान हा अखंड राहावा यासाठी प्रयत्न करून एक अखंड भारताची संकल्पना मांडली. त्यामुळे या लोहपुरुषाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन एकता दौड काढत साजरा केला जात आहे." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत पोलीस कर्मचारी सुशांत पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.










