
कुडाळ : कुडाळ - मालवणचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस २६ मार्च २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध अशा गरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये रक्तदान शिबीराच्या आयोजनातून ५०० बाटल्या रक्त संकलन करण्यात येणार आहे. तसेच मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून त्यातील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत लोकप्रिय असलेल्या शिमगोत्सव (रोंबाट, राधा नृत्य, चित्ररथ, देखावे ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबीर - दि. १९ मार्च रोजी असरोंडी, २० मार्च रोजी पिंगुळी, २१ मार्च कुडाळ शिवसेना शाखा, २३ मार्च पावशी, २४ मार्च घोटगे व २६ मार्च २०२३ रोजी विजयराव नाईक फार्मसी कॉलेज, शिरवल येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
निमंत्रितांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दि. २३ व २४ मार्च २०२३ रोजी सायं ६ वा. कुडाळ तहसील कार्यालय नजीक क्रीडासंकुल मैदान येथे होणार आहे. जिल्ह्यातील अनेक नामवंत संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३५ हजार व चषक, द्वितीय पारितोषिक २० हजार व चषक, तृतीय व चतुर्थ पारितोषिक, प्रत्येकी ७ हजार व चषक, सर्वोत्कृष्ट खेळाडू ,सर्वोत्कृष्ट चढाई ,सर्वोत्कृष्ट पकड यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
शनिवार दि. २५ मार्च २०२३ रोजी सायं ६ वा. सिंधुदुर्ग जिल्हयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा विविध रंगी असा शिमगोत्सव (रोंबाट) कार्यक्रम कुडाळ तहसील कार्यालय नजीक क्रीडासंकुल मैदान येथे होणार आहे. यामध्ये पारंपारिक रोंबाट, राधा नृत्य, भव्य दिव्य असे चित्ररथ, देखावे, सुस्वर गायन, वादन सादर केले जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा व आनंद लुटावा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.