
दोडामार्ग : पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई आणि श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने मंडळाच्या व प्रशालेच्या ५० व्या वर्षानिमित्त सुवर्णमहोत्सव करण्याचे योजिले आहे. हा कार्यक्रम प्रशालेच्या पटांगणात ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी साजरा होणार आहे. यावेळी अनेक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत दिली. दोडामार्ग येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे पदाधिकारी बोलत होते. यावेळी मंडळाचे सचिव प्रमोद गवस व ऍड. अनिल गवस उपस्थित होते.
प्रमोद गवस पुढे म्हणाले की, पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबईचे सन २०२१ -२२ रोजी ५० वे वर्ष होते. परंतु कोरोना सारख्या महामारीमुळे सदरचा कार्यक्रम करता आला नाही. तर सन २०२४ - २५ हे श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळेचे ५० वे वर्ष आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा संगम साधून प्रशालेच्या पटांगणात सुवर्णमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थ, हितचिंतक, शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील यावेळी मंडळातर्फे व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
अनेक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त स्मरणिका प्रकाशन, २०२५ ची वार्षिक दिनदर्शिका छापणे, स्पर्धात्मक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ, विद्यार्थ्यांचे अनेक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.