'वंदे भारत'च सावंतवाडीतून झलक दाखवत मार्गक्रमण !

सावंतवाडीकरांनी व्यक्त केल्यात भावना
Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 19:25 PM
views 123  views

सावंतवाडी :  मुंबई ते मडगाव दरम्यानच्या वंदे भारत-एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर आजपासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. कोकणातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्याची संधी यामुळे मिळाली. परंतु, महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक असणाऱ्या सावंतवाडीत ह्या एक्सप्रेसला थांबा मिळावा ही मागणी पूर्ण न झाल्यानं 'झलक' दाखवत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पहाण्याची वेळ सावंतवाडीकरांवर आली आहे.


गेली अनेक वर्षे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न रखडला आहे. फेज वन च काम पूर्ण झाल असून फेज टू च काम रखडलं आहे. सावंतवाडीत केवळ आठ ते नऊ रेल्वे गाड्या थांबत असून रेल्वेसाठी सावंवाडीकरांना कुडाळ, कणकवलीचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटन दृष्ट्या विकासाला चालना मिळाली म्हणून कोकणात आलेली वंदे भारत एक्सप्रेस सावंतवाडीत थांबावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून व सावंतवाडीकरांच्या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु, सावंतवाडीकरांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे. झलक दाखवत जाणारी वेगवान वंदे भारत एक्सप्रेस पहायची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. याबाबत सोशल मिडियावर सावंवाडीकरांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. 


वंदे भारत एक्स्प्रेस प्रत्येक स्थानकावर थांबलीच पाहिजे. तर तीच खरी लोकशाही. राज्य घटनेने तो हक्क आम्हाला दिलेला आहे. : दत्तप्रसाद गोठस्कर, सामाजिक कार्यकर्ते 



कधी काळी बैलगाडीला कोकण रेल्वे म्हणणारे आम्ही स्टेशनला थांबा मागतोय ही खरी नियती, मा.दंडवतें सारखे लोकप्रतिनिधी आले तरच शक्य नाहीतर टर्मिनस आणि मल्टीस्पेशालिटी स्पेलिंग वाचा लिहा पाठ करा : अँड. राजेश पराडकर


सावंतवाडीमध्ये पर्यटक यावेत अशी कोणती नविन आकर्षण केंद्रे झालीत? जी ठिकाणे आहेत त्यांची जोपासना होतेय का? काही अभिनव संकल्पना सावंतवाडीतील रिसोर्सेसचा वापर करून राबवल्या नाहीत तर सावंतवाडीला आणखी वाईट दिवस बघावे लागणार आहेत.सर्व महत्वाचे मार्ग बाहेरुन जाताहेत. पर्यटक काही आकर्षण असेल तरच येतात.पर्यटकांचा ओघ वाढला तर थांबे सुद्धा वाढतील पण... : डॉ. राजेश कार्लेकर



आपली मानसिकताच नाही विकासाची, मग विकास कसा होईल. सावंतवाडीची जनता झोपलीय. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि सावंतवाडी टर्मिनस हे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय एक आरोग्य आणि दुसरा पर्यटनातील महत्वाचा दुवा. पण आपली शोकांतिका अशी की आपल्याला त्याचे काही पडलेलेच नाही. लोकप्रतिनिधी हवेत गोळीबार करून गाजर दाखवतात. कालचा स्थानिक आमदारांचा पत्रकार परिषदेत आमदारांनी या मतदार संघातील तीन तालुक्यातील एक अशी फक्त तीन कामे अपूर्ण आहे हे सांगूनही टाकलय. सावंतवाडी टर्मिनसचा विषयाला बगल दिली. आणि याबद्दल त्यांना कोणी विचारले देखील नाही. हॉस्पिटल मागचे ६ वर्ष होतंय अजुन एक वर्ष तेच चालेल. सावंतवाडीचा विकास व्हावा हे सावंतवाडीकरांना वाटत नाही तशी मानसिकता ही दिसत नाही.

आपल्या पाठून कुडाळ, कणकवली ही शहरे खूप पुढे गेलीत काही वर्षांनी बांदा व ओरोस देखील पुढे जाईल तेव्हा देखील आपली मानसिकता हीच असेल.हे अपयश फक्त लोकप्रतिनिधींचे नसून मतदारांचे आहे. इथल्या जनतेचे आहे.वंदे भारत चा थांबा नाही मिळाला म्हणून कुडाळची लोक एकत्र येऊन प्रशासनाला धारेवर धरतात पण आपल्या इथे तस काही हालचाल नाही.एकट्या वंदे भारत ने भरपूर रोजगार दिला असता. फक्त तिकीट महाग म्हणून नको म्हणणाऱ्यांना पुढे जसा हायवे बाहेरून गेल्यावर त्याची किंमत कळाली तसच ही या ट्रेन मुळे होणार आहे. त्या ट्रेन मधून आपल्या सारखा सामान्य नागरिक नाही येणार परंतु पर्यटक नक्कीच आले असते.त्यांनी इथल्या लोकांना अप्रत्यक्ष पणे रोजगार नक्कीच दिला असता. : सागर तळवडेकर, सदस्य, कोकण रेल्वे प्रवासी संघटना


एकंदरीतच, सावंतवाडीकरांच्या नशीबी यातना आल्या आहेत. केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच रेल्वे मळगाव स्टेशनवर थांबत असल्याने  रेल्वेसाठी कुडाळवारी करावी लागत आहे. 'वंदे भारत' ची एक अपेक्षा होती ती देखील सध्यातरी एक्सप्रेसप्रमाणेच सुपरफास्ट उडून गेली आहे.