वाळूने भरलेल्या डंपरची विद्युत खांबाला धडक !

6 तास विद्युत पुरवठा बंद
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 08, 2023 18:33 PM
views 464  views

कुडाळ : वाळू भरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने कुडाळ येथील गवळदेव येथे विद्युत खांबाला धडक दिली. या धडकेमध्ये विद्युत खांब कोसळला आणि कुडाळ शहरातील विद्युत पुरवठा तब्बल सहा तासांसाठी खंडित झाला याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात डंपर चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला यादरम्यान कुडाळ शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. हा विद्युत पुरवठा तब्बल सहा तासाने सुरू झाला याबाबत माहिती घेतली असता नेरुरवरून एमआयडीसी मार्गे कुडाळ गवळदेव मंदिराकडून गोव्याच्या दिशेने जाणारा वाळू भरलेला (जीए- ०९- यु- २७५१)  या डंपरने गवळदेव येथे असलेल्या विद्युत खांबाला धडक दिली. त्यामुळे विद्युत तारा तुटून खाली पडल्या तसेच विद्युत खांब कोसळला. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.

याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार हरेश पाटील यांनी तक्रार दिली असून ही वाळू वाहतूक अनधिकृतपणे केली जात होती. याप्रकरणी डंपर चालक शशीकुमार सिंह (रा. झारखंड) व डंपर मालक अक्षयकुमार केंद्रे (गोवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.