
सावंतवाडी : नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान-5 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही 2 कृत्रिम तलावांची व्यवस्था शहरात सर्वोदय नगर , लक्ष्मी नगर (जूस्तीन नगर) जवळ केली आहे. निसर्गापासून तयार केलेल्या वस्तु पर्यावरणाला हानी न पोहोचता निसर्गामद्धे पुनः समर्पित व्हाव्यात हा यामागचा उद्देश आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेने तयार केलेल्या लक्ष्मी नगर –(जुस्तिन नगर नजिक) कृत्रिम तलावामद्धे पाचव्या दिवशी लक्ष्मण भीकाजी गावडे , वय 79 राहणार जुस्तिन नगर यांनी आपली गणेशाची मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित केली. यावेळी त्यांच्यासोबत सर्व कुटुंबीय उपस्थित होते. पर्यावरण रक्षणासाठी या गावडे आजोबांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावला आहेच. याशिवाय सर्वांसमोर स्वतः चा एक आदर्श घालून दिला आहे. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यास सहकार्य केले आहे. या त्यांच्या कृतीबद्दल मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी त्यांचे झाडाचे रोपटे देऊन अभिनंदन केले व आभार व्यक्त केले . सर्व नागरिकाना पर्यावरण रक्षणासाठी आपल्या गणेश मूर्तीच्या विसर्जनसाठी कृत्रिम तलावाचा वापर करणेचे आवाहन केले आहे. या मूर्तीपासून प्राप्त होणारी माती पुन्हा मूर्तिकारांना देण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे.