
सावंतवाडी : कलंबिस्त हायस्कूलमधील १९९२-९३ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एक अनोखी मदत देऊ केली आहे. त्यांनी 'पदवी ते उच्च शिक्षण विद्यार्थी दत्तक योजना' सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत, आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेणे अवघड असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
या उपक्रमाची घोषणा करताना, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव, माजी विद्यार्थी ॲड. संतोष सावंत म्हणाले की, या बॅचमधील अनेक माजी विद्यार्थी आज विविध शहरांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून, कलंबिस्त पंचक्रोशीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली जाईल. याच कार्यक्रमात, माजी विद्यार्थी बॅचच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत, दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या व शाळेतून प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या चार विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तनिषा संतोष ठाकर, द्वितीय क्रमांक मिळवलेली श्रावणी राजन सावंत, तृतीय क्रमांकाची मानसी दशरथ सावंत आणि मराठीत सर्वाधिक गुण मिळवणारी हर्षा एकनाथ राऊळ या विद्यार्थिनींचा समावेश होता. मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्या हस्ते रोख रक्कम व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
शाळेच्या यशस्वी वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
यावेळी बोलताना मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, "शाळेची प्रगती आणि १००% निकाल पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे होत आहे. पण माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे गावाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल."
याच कार्यक्रमात, १९९२-९३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भौतिक सुविधांसाठी दोन पंख्यांचीही भेट दिली. तसेच, शाळेचे वरिष्ठ लिपिक विष्णू पास्ते यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी काशिनाथ महडगूत, रवींद्र जंगम, रवी कमल सावंत, अर्चना सावंत यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.










