
देवगड : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नणंद पूजा सदाशिव जोगल ( ३०, रा. मिठबाव, पूर्वाश्रमीची पूजा सुहास भाबल) हिला सिंधुदुर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तिर्लोट - आंबेरी येथील विवाहिता शिरीषा उर्फ श्रीशा सुरज भाबल हिला तिच्या दोन लहान मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असलेली संशयित तिची नणंद पूजा सदाशिव जोगल हिला सिंधुदुर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याकामी संशयिताच्यावतीने अॅड. कौस्तुभ मराठे यांनी युक्तिवाद केला.
तिर्लोट - आंबेरी येथील श्रीशा भाबल या विवाहितेचा सासू सासरे, पती व नणंद यांच्याकडून सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून श्रीशा हिने १५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या दोन लहान मुलांसह आंबेरी खाडीवरील सागरी महामार्गावर असणाऱ्या पूलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेत श्रीशासह तिचे मुलगे श्रेयश (वय ५) व दुर्गेश (वय ४) याचाही बुडून मृत्यू झाला होता.
या घटने नंतर सासू-सासरे व पतीला तात्काळ अटक करण्यात आली होती. तर संशयित नणंद पूजा ही फरार होती. मात्र, संशयित नणंद पूजा हिला आता अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
श्रीशाने आत्महत्येपूर्वी मुंबई येथे राहणाऱ्या तिच्या आईला कॉल करून आपण जीव देत असल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर श्रीषाची आई श्रीमती चंद्रकला लोकेश कुमार (३८, सध्या रा. अंबरनाथ (प.) ठाणे, मूळ रा. रायचूर कर्नाटक) यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीशाचे सासू-सासरे, पती व नणंद या संशयितांवर भारतीय न्याय संहिता कलम ८५, ८६, १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.