आरोग्य सेवकाला मारहाण प्रकरणी सुरज जाधव विरोधात गुन्हा दाखल

Edited by:
Published on: September 05, 2023 13:55 PM
views 451  views

कुडाळ : वैद्यकीय तपासणीसाठी घरोघरी रुग्णांचे सर्वेक्षण करायला गेलेल्या वेताळ बांबर्डे उपकेंद्राचे आरोग्य सेवक सुधीर पिलाजी धामणकर यांना पणदूर येथील सिद्धार्थ नगर मधील सुरज अनंदा जाधव (वय ३०) याने मारहाण केली याप्रकरणी शासकीय कामात अडथळा करून मारहाण केल्याप्रकरणी सुरज जाधव यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आरोग्य सेवक सुधीर धामणकर हे पणदूर येथील सिद्धार्थ नगर मध्ये सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते. हे सर्वेक्षण आरोग्याच्या संबंधित होते. जेव्हा सुरज जाधव यांच्या घरी गेल्यावर सुधीर धामणकर यांना सुरज जाधव यांनी विचारणा केली की, माझ्या पत्नीला टीबी, कॅन्सर झालाय अशी विचारणा करून मारहाण केली. तसेच पाथरी दगड उचलून सुधीर धामणकर यांच्या दिशेने भिरकावला मात्र हा दगड सोडवण्यासाठी आलेल्या हर्षद जाधव यांच्या हाताला लागून तो दगड सुधीर धामणकर यांच्या डोकीला लागला. या मारहाणीत आरोग्य सेवक सुधीर धामणकर हे जखमी झाले. दरम्यान याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्यांनी सुरज अनंदा जाधव यांचे विरोधात तक्रार दिली असून शासकीय कामात अडथळा करून मारहाण केल्याप्रकरणी भादवि कलम ३५३, ३५२, ३३२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर करीत आहेत.