
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील तुळसुली ऐक्यवर्धक संघ संचलित मान्यताप्राप्त अनुदान प्राप्त खाजगी माध्यमिक लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या मुकुंद आत्माराम वारंग यांनी संस्थेच्या बचत खात्यातील आपल्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये २१ लाख ८६ हजार ९७२ एवढी रक्कम वर्ग करून व रोख स्वरूपात काढून शैक्षणिक संस्थेच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळसुली येथील शैक्षणिक संस्थेमध्ये झालेल्या या अपहरणाबाबत कृष्णा केशव वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की तुळसुली ऐक्यवर्धक संघ संचलित मान्यताप्राप्त अनुदान प्राप्त खाजगी माध्यमिक लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेले मुकुंद आत्माराम वारंग यांनी संस्थेच्या बचत खात्यातील पहिल्यांदा ५ लाख ६९ हजार ६६८ एवढी रक्कम त्यांच्या स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतली त्यानंतर ६ लाख ४४ हजार २६६ रुपये एवढ्या रकमेच्या चेकवर खोट्या स्वाक्षरी करून ही रक्कम रोख स्वरूपात काढून घेऊन ती स्वतःच्या आर्थिक फायदा करिता वापरलेली आहे तसेच तुळसुली ऐक्यवर्धक संघ मुंबई, तुळसुली या नावाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खोट्या व बनावट मुदत बंद ठेवीच्या ९ लाख ७३ हजार २० रुपये एवढ्या रकमेच्या सात खोट्या पावत्या बनवून त्या लेखापरीक्षण अहवालामध्ये खऱ्या असल्याच्या भासवून ही रक्कम सुद्धा काढली. अशी एकूण २१ लाख ८६ हजार ९७२ एवढ्या रकमेचा अपहार केलेला आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुकुंद आत्माराम वारंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.