'त्या' विक्षिप्तावर गुन्हा दाखल..!

नागरिकांनी घेतली पोलिसांची भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: July 22, 2024 12:07 PM
views 480  views

सावंतवाडी : शिरोडा नाका येथील नागरिकांनी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेत त्या विक्षिप्त व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, माड कापून लोकांच्या जीवितास हानी पोहोचेल असे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. ‌ 

आज दुपारी २.३० च्या सुमारास शिरोडा नाका परिसरात माडाचे झाड हे जाणीवपूर्वक व हेतूपुरस्कररित्या विद्युत भारीत खांबावर कोसळून येथील गिरण व किराणा दुकानदार प्रकाश शेटकर यांच्या मार्फत मोठी दुर्घटना घडविण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, सदर सावंतवाडी ते वैगुर्ला रस्ता (शिरोडा नाका) हा रहदारीचा मुख्य रस्ता असल्याकारणाने यात मनुष्य बळी जाण्याची शक्यता होती. दैव बलवत्तर म्हणून घटनास्थळी उपस्थितांचे जीव वाचले. या घटनेला कारणीभूत येथील गिरण व किराणा दुकानदार प्रकाश शेटकर आहेत.

त्यांच्या दुकानासमोरील अडथळा निर्माण होत असल्याकारणाने, त्यांनी हा माड ब्लेडच्या सहाय्याने अर्धवट कापण्याचे दुष्कृत्य केलेले आहे. असे आमच्या निर्देशनास आले आहे. हा इसम गेली कित्येक वर्षे अशा प्रकारचे कृत्य वारंवार करीत आलेला आहे. यासंबंधित प्रकाराची आपल्या धर्तीवर सखोल चौकशी करावी. या व्यक्तीकडून आमच्यासह अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आजची घटना बघता संबंधिताची मानसिक स्थिती खालावली असल्याचेच जाणवत आहे. त्यामु‌ळे अशा प्रकारचे कृत्य पुन्हा घडू शकते. या प्रकाराचा विचार करता संबंधितावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा भविष्यात लोकांचे हकनाक जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या विनंतीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा असं निवेदन शिरोडा नाका येथील नागरिकांनी पोलिस निरीक्षकांकडे दिलं. 


यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, संबंधित व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतले आहे. लोकांच्या जीवीतास धोका, इलेक्ट्रीसीटी अॅक्ट व नगरपरिषदेची परवानगी न घेता वृक्ष तोड आदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगरपरिषद व महावितरणच्या अधिकाऱ्यांचा जबाब देखील यात घेतला जाणार आहे‌. संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षकांनी दिली. याप्रसंगी आबा सावंत, संजय वरेरकर, क्लेटस फर्नांडिस, अनिल सावंत, सुशील चौगुले, मंजुनाथ देसकर, रोहन नरसुले, संदीप नाईक आदी उपस्थित होते.